2022

कृषीवल हळदीकुंकू समारंभ

बहुजन हिताय, सुखाय बहुजन, या ब्रिदवाक्यास अनुसरून 7 जून 1936 साली स्वर्गीय नारायण नागू पाटील यांनी इंग्रजी राजवाटीत कणखर, निर्धिस्तपणे आपला आवाज उठविण्यासाठी तसेच सर्वसामान्यामध्ये जनजागृतीसाठी कृषीवल या वृत्तपत्राचे लोकार्पण करीत अन्यायाविरोधातील शस्त्र हाती घेतले.
कृषीवलच्या माध्यमातून स्वर्गीय नारायण नागू पाटील, स्वर्गीय प्रभाकर पाटील यांनी आपल्या लेखणीतून शेतकरी आणि कामगारांचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रात पोहाचवला. कृषीवल घराघरात पोहचले.

आजच्या इंटरनेट किंवा प्रिंट मिडीयाच्या स्पर्धात्मक युगात कृषीवल तितक्याच समर्थपणे आणि उमेदीने कार्य करीत आहे. कृषीवल डिजीटल आवृत्तीच्या माध्यमातून जागतिक पातळीवरही पोहचला आहे. यशाची 86 वर्षे अखंडपणे वाचकांना सेवा पुरविण्याचे काम कृषीवल करीत आहे. कृषीवल खर्‍या अर्थाने जनसामान्यांचा आरसाच आहे. कारण कृषीवल वृत्तपत्र नाही, तर चळवळ आहे. आणि ही चळवळ गेली 86 वर्षे अखंडपणे चालू आहे. येत्या 7 जूनला हे वृत्तपत्र 87 व्या वर्षात पदार्पण करीत आहे.
बदलत्या युगाबरोबर कृषीवलचा आकार आणि स्वरूप बदलताना अद्यावत तंत्रज्ञानांचा आणि यंत्रसामग्रीचा वापर करून कृषीवलची गुणवत्ता आणि सुबकता वाढविण्याचा निर्धार करून आमदार जयंत पाटील, माजी आमदार मिनाक्षी पाटील, आमदार पंडीत पाटील, राजन पाटील, सुनंदा पाटील,  सुप्रिया पाटील, नृपाल पाटील आणि आता चित्रलेखा पाटील यांनी कृषीवलला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले. काळ बदलतो. बदल हा स्थायीभावच आहे आणि म्हणूनच कृषीवल नेहमीच काळाची पावलं ओळखून बदल घडवत गेला. गतवर्षी हे लोकप्रिय वृत्तपत्र डिजीटल आवृत्तीसह मोबाईल अ‍ॅपच्या नव्या रुपात नागरिकांसाठी उपलब्ध झाले. आधुनिकतेसह कृषीवलने उचललेले हे पाऊल सर्वसामान्यांच्या पसंतीस उतरत आहे.
लोकाभिमुख दैनिक कृषीवलच्या माध्यमांतून बदललेले डिजीटलचे स्वरुप उत्तरोत्तर प्रभावी काम करीत आहे. तंत्रज्ञानाच्या युगात संपर्क माध्यमांची उपकरणे कितीही बदलली तरी कृषीवल चळवळीची संस्कृती टिकून राहिल. पद्धती बदलतील, परंतु ज्ञानार्जनाची संस्कृती बदलणार नाही, तर ती आणखीनच वृद्धिंगत होईल. पाटील कुटूंबियांच्या चारही पिढींनी कृषीवलची ओळख वैचारिक व ध्येयवादी वृत्तपत्र अशी करून दिली. विश्‍लेषणात्मक व चिकित्सक लेखन प्रसिद्ध करण्याला प्राधान्य दिले. कृषीवलची भूमिका भारतीय संविधानातील मूल्यांचा परिपोष करणारी राहील, याची काळजी घेतली. गेली 27 वर्षे कृषीवल कृषीवल हळदीकुंकू सोहळा आयोजित करीत आहे.

पारंपरिक सणांना आधुनिकतेची झालर चढली असली तरी, अजूनही स्त्रियांनी अनेक पारंपरिक सणांचे महत्त्व कायम ठेवले आहे. त्यापैकी एक म्हणजे हळदीकुंकू समारंभ. गेली 12 वर्षे मी कृषीवल हळदीकुंकू समारंभाची जबाबदारी सांभाळत आहे. 27 वर्षापूर्वी सुप्रियाताईंनी ज्या परंपरलेला सुरुवात केली, त्याची जबाबदारी घेताना प्रचंड दडपण होतं. मात्र इच्छाशक्ती दांडगी होती. हळदीकुंकू सोहळा भव्य स्वरुपात व्हावा, यासाठी अथक प्रयत्न केले. त्याची पोचपावती या सोहळ्यात उपस्थित महिलांनी कायम दिली.
जिल्ह्यातील महिलांना कृषीवल हळदीकुंकू समारंभात येण्याची ओढ, त्यांचे आशीर्वाद, त्यांच्या चेहर्‍यावरील द्विगुणित झालेला आनंद हे सारं पाहताना अभिमान वाटतो.
कृषीवल हळदीकुंकू सण म्हणजे महिलांचा सण. त्यांच्या गरजा ओळखून, व्यवहारज्ञान अंगीकारुन काळानुरूप वाणांच्या वस्तू बदलल्या. वाढती महागाई, महिलांचे प्रश्‍न, त्यांच्या गरजा सार्‍याचा विचार करुन कृषीवल हळदीकुंकवाचे वाण ठरवले जाते.
घर आणि नोकरी अशी दुहेरी कसरत पेलताना बरेचदा महिलांना मानसिक ताणतणावाला सामोरे जावे लागते. अशावेळी वर्षातून एकदा येणारा कृषीवल हळदीकुंकू सोहळा त्यांना विरंगुळ्याचे चार क्षण देण्यासाठी मदतीचा हात ठरत आहे. पूर्वी हळदीकुंकवासोबतच वाण म्हणून मातीचे सुगडे, हिरव्या बांगड्या, काळे मणी, जोडवे ही सौभाग्य लेणी दिली जात होती. मात्र कृषीवलने यात बदल करीत महिलांच्या दैनंदिन जीवनात उपयोगासाठी असणारे, त्यांची गरज पाहून वाण दिले. कोरोना महामारीचा संपूर्ण जगाला फटका बसला. अशातच जिल्ह्यावर आलेले चक्रीवादळ, दरड कोसळल्याने गृहिणी पुरत्या खचून गेल्या होत्या. त्यामुळे महिलांना मदतीचा हात म्हणून कृषीवलने यावर्षी धान्य वाटप केले. संकटकाळात कृषीवलने दिलेल्या आधारामुळे हजारो महिलांच्या चेहर्‍यावर असलेले समाधान, मनोमनी दिलेला आशीर्वाद, कृषीवलसोबत निर्माण झालेले त्यांचे नाते या सार्‍याची शिदोरी घेऊन नव्या उमेदीने, नव्या ताकदीने, अथक प्रयत्न करीत पुढील वर्षीचा हळदीकुंकू सोहळा महिलांच्या अपेक्षेनुसार करीत राज्य पातळीवर पोहोचविण्याचे आमचे स्वप्न नक्कीच सत्यात उतरेल.

चित्रलेखा पाटील,
व्यवस्थापकीय संचालक, कृषीवल

jewellery-sign

जनतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला रायगड, डॉ. बाबासाहेबांच्या संघर्षाने उजळलेले महाडचे चवदार तळे रायगडचेच, देशातील शेतकर्‍यांचा संप करुन त्यांना संघर्षाचा मार्ग दाखविणारे नाना पाटील व त्यांचा वारसा पुढे चालविणारे भाई प्रभाकर पाटील यांची कर्मभूमीदेखील रायगडच. संघर्षाच्या मार्गाने कष्टकरी, शेतकरी व सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचा रायगड जिल्ह्यातील इतिहास फार जुना आहे. या संघर्षाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांपासून सुरु होते व अलिकडच्या सेझच्या लढ्यापर्यंत व त्यानंतरही विविध लहान-मोठ्या लढ्यातून प्रतिबिंबीत होत असते.
आधुनिक काळातील पुरोगामी रायगडातील ही परंपरा कृषीवलच्या हळदीकुकू समारंभाने प्रकर्षाने जपली आहे. अर्थात हे हळदीकुंकू म्हणजे सौभाग्यवतीने केवळ वाण लुटण्याचा कार्यक्रम नाही, तर त्यातून स्त्रियांतील समतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. हे हळदीकुंकू म्हणजे केवळ हिंदू महिलांचा समारंभ नाही तर सर्वधर्मीय सर्व पंथ, जाती-पातींतील महिलांसाठी केला जाणारा समारंभ आहे. आपल्या हिंदू धर्मातील प्रथेनुसार हळदकुंकू हा समारंभ केवळ सौभाग्यवतींसाठीच असतो. मात्र या हळदीकुंकू समारंभात विधवा, परितक्त्या अशा सर्वांचीच आर्वजून उपस्थिती असते. एखादी विवाहीत महिला विधवा झाली किंवा तिला नवर्‍याने टाकल्याने परितक्त्या झाली तर तिला हा समारंभ साजरा करण्याचा अधिकार नसतो. एकप्रकारे एका स्त्रीने दुसर्‍या स्त्रीवर अजाणतेपणाने केलेला हा एक प्रकारचा अन्यायच असतो.
कृषीवलच्या या हळदीकुंकू समारंभात महिला वर्गातील ही विषमता दूर करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्यामुळे या समारंभात मोठ्या उत्साहाने विधवा व परितक्त्या सहभागी होतात व वाण लुटण्याचा आनंद उपभोगतात. स्त्रियांमधील समतेचा हा वारसा रायगड जिल्ह्याने या कार्यक्रमाच्या निमित्ताने जपला आहे. यात मुस्लिम महिलांचा असलेला उत्स्फूर्त सहभाग ही देखील एक जमेची बाजू. हळदीकुंकवाच्या माध्यमातून महिलांच्या समूहाने आपल्यातील असमानता दूर करण्यासाठी केलेला हा एक प्रयत्न आहे. अशा समता जपणार्‍या कार्यक्रमाचा भाग कृषीवल आहे, याचा अभिमान वाटतो.

प्रसाद केरकर,
सल्लागार संपादक, कृषीवल

jewellery-sign

एकाच व्यासपीठावर हजारो महिलांची उपस्थिती, ढोल-ताशाचा गजर, पारंपरिक वेशभूषा, आयोजकांची धावपळ, उपस्थितांकडून कौतुकाचा स्वर, अनेकांसाठी आयुष्याच्या नव्या पर्वाची उमेद, चेहर्‍यावर खुललेले हास्य अन् कलाकारांची मैफल असलेला कृषीवल हळदीकुंकू सोहळा  खर्‍या अर्थाने डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरतो.
सामाजिक एकोप्याचे प्रतिक ठरणार्‍या या सोहळ्यात हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई आणि पारशी अशा सार्‍या महिलांची उपस्थिती ही लक्षवेधी ठरते. हळदीकुंकू सोहळा म्हटलं कि, रोजच्या कामाच्या धबडग्यातून वेळ काढून तमाम स्त्रियांनी एकत्र जमायचं, गप्पा मारायच्या आणि चार घटका मौजमजा करायची, हाच खरा तर या प्रथेमागचा मुख्य हेतू. पण, आज घरातल्या महिलेचं घराबाहेर पडणं हे केवळ विरंगुळ्यापर्यंत मर्यादित राहिलं नाही. घरातल्या कर्त्या पुरुषाला अर्थाजनातही हातभार, शिक्षण, स्वावलंबन, आत्मसन्मान अशा अनेक निमित्ताने महिला घराबाहेर पडू लागल्या. त्यामुळे महिला घराबाहेर पडत असल्या तरीही या सणांचं महत्त्व तसूभरही कमी झालेलं नाही. कारण कृषीवल हळदीकुंकू सोहळा आज संपूर्ण रायगड जिल्ह्यातील महिलांचा घरचा सोहळा झाला आहे. त्यांचं हक्काने येणं, वाण लुटणं, परंपरा जपणं, मराठी अस्मिता जपणं हे सारं काही या सोहळ्यात पहायला मिळतं.
या सोहळ्याचं कौतुक वाटवं तितकं थोडं. कारण कृषीवलने खर्‍या अर्थाने या पारंपारिक हळदीकुंकू सोहळ्यात परिवर्तन घडवलं. हा सोहळा पती हयात नसलेल्या महिलांसाठी वर्ज्य न करता, पती निधनाच्या दुःखामुळे पिचलेल्या त्या महिलेला क्षणिक का होईना आनंद देण्याचा प्रयत्नही कृषीवल या माध्यमातून करीत आहे. महिलांना सन्मानाने वागवण्याचा, त्यांना आनंद देण्याचा कृषीवलने केलेला निर्धार खरोखरच उल्लेखनीय आहे. यावर्षी माणगाव, खालापूर या ठिकाणी केलेल्या हळदीकुंकू सोहळ्यात पती हयात नसलेल्या महिलांनीही उपस्थिती दर्शविली. सोहळ्यात मिळणारा मान-सन्मानामुळे त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद हीच खरी कृषीवलने आयोजित केलेल्या सोहळ्याची पोच पावती आहे. या सोहळ्यास मिळणारा उदंड प्रतिसाद म्हणजे महिलांमधील वैचारिक बदलाची पहाट असल्याचंच द्योतक आहे.

माधवी सावंत,
संपादक, डिजिटल आवृत्ती

jewellery-sign
कृषीवल हळदीकुंकू समारंभ

इतिहास

2022

कृषीवल हळदीकुंकू समारंभ

तारकांच्या आगमनाने महिलांचे मन अगदी भारावून जाते, या हळदीकुंकवात फक्त गर्दीच नव्हे तर माणूसकीही प्रकर्षाने दिसून येते.
कलाकरांची उपस्थिती अन् हळदीकुंकवाचा जल्लोष आहे, दिवस मानाचा-सौभाग्याचा, सर्वांसाठीच खास आहे!
फक्त माणूसपणा लक्षात घेत वाटचाल ही सुरू आहे, संकटं जरी वाटेत आली, तरी माणुसकीचा लढा कायम सुरू आहे… भव्यदिव्य अशा या सोहळ्याला माणूसपणाचा साज आहे, म्हणूनच तर साधेपणा हाच या सोहळ्याचा खरा ताज आहे!
हळदीकुंकवाची गर्दी पाहून मनही अगदी भांबावून जाते, सोहळ्याचे यश, पडद्यामागच्या कामांचे किस्से सांगत राहते.
उत्सवाला हजेरी लावून स्त्रीशक्तीला हाक दिली, आवाजाच्या कणखरतेतून माणूसपणाला साद दिली…
आ. जयंत पाटील यांनी प्राधान्याने उपस्थिती लावली, यालाच खरा नेता म्हणतात, ही बाब कार्यातून दिसून आली!

2021

कृषीवल हळदीकुंकू समारंभ

गेली 27 वर्षे अखंडितपणे मोठ्या उत्साहात साजरा होणारा कृषीवल हळदीकुंकू समारंभ आज एका वेगळ्या उंचीवर पोहोचला आहे. 27 वर्षापूर्वी लावलेले हे चिमुकले रोपटे आज वटवृक्षात रुपांतरीत झाले आहे. अलिबाग शहरातून सुरु केलेला समारंभ आज रायगड जिल्ह्यातील घराघरांत पोहोचला तर महाराष्ट्रातील महिलांना या सोहळ्याची उत्सूकता लागली आहे. स्व. नारायण नागू पाटील यांनी कायमच महिलांचा सन्मान केला. म्हणूनच यांच्या पुण्यातिथीनिमित्त या सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.
2019

कृषीवल हळदीकुंकू समारंभ

सतत चालणार्‍या पावलांना रस्ता नेहमी थिटा वाटतो,
काम करणार्‍या हातांना परमेश्‍वर हसरी दाद देतो.
2018

कृषीवल हळदीकुंकू समारंभ

उत्सुकता वाणाची अन् गोडवा तिळगुळाचा, खेळ शब्दांचा आणि दिलखेचक उखाण्यांचा,
दिवस असा हा मानाचा अन् सार्‍यांच्याच सौभाग्याचा, ओळख क्षणार्धाची, पण ॠणानुबंध आयुष्याचा!
2017

कृषीवल हळदीकुंकू समारंभ

परंपेच्या या हळदीकुंकवाच्या सोहळ्यात अनेक माणसं मिळत गेली,
सुरूवात केली होती शून्यातून, पण नाळ अचानक जुळत गेली.
हळदीकुंकवाच्या कार्यक्रमात घेऊनी सौभाग्याचं लेणं, माणुसकीच्या समाजकारणात लेवूनी माणुसकीचं देणं.
2016-15

कृषीवल हळदीकुंकू समारंभ

सण हा तुमचा, आमच्यासाठी मानाचा!
सण-समारंभातून आपल्या संस्कृतीचे जनत करावे, महिलांना एकत्र येण्यासाठी त्यांना व्यासपीठ मिळावे, या माध्यमातून विचारांची देवाण-घेवाण करुन महिलांनी महिलांच्या उन्नत्तीसाठी प्रयत्न करण्याच्या हेतून कृषीवल हळदीकुंकू सोहळा दरवर्षी आयोजित करण्यात येतो.
2014

कृषीवल हळदीकुंकू समारंभ

सण हा तुमचा, आमच्यासाठी मानाचा!
सण-समारंभातून आपल्या संस्कृतीचे जनत करावे, महिलांना एकत्र येण्यासाठी त्यांना व्यासपीठ मिळावे, या माध्यमातून विचारांची देवाण-घेवाण करुन महिलांनी महिलांच्या उन्नत्तीसाठी प्रयत्न करण्याच्या हेतून कृषीवल हळदीकुंकू सोहळा दरवर्षी आयोजित करण्यात येतो.
2013

कृषीवल हळदीकुंकू समारंभ

उपस्थिती तुमची, इच्छा आमची
महिला कोणत्याही धर्माची असो, त्यांना माणूस म्हणून वागवलं गेलं पाहिजे, जसा मान लग्नाच्या आधी मिळतो, तसाच मान पतीच्या निधनानंतरही मिळाला पाहिजे. तरच आपला समाज खर्‍या अर्थाने पुढारेल, ही भावना कायमच कृषीवलने जोपासली.
2012

कृषीवल हळदीकुंकू समारंभ

सण सौभाग्याचा, कृषीवल हळदीकुंकवाचा!
सौभाग्याचं लेणं लाभलेल्या स्त्रीला जेव्हा अचानक वैधव्य येतं, तेव्हा तिची अवहेलना सुरू होते. आतापर्यंत तरी हेच चित्र दिसत होतं. मात्र, या चालीरिती बदलून कृषीवलने विधवा महिलांना हळदीकुंकवाचा मान दिला. महिलांना सन्मानानेच वागवावे यासाठी कृषीवलने पुढाकार घेऊन विधवा महिलांनाही हळदीकुंकू सोहळ्यात मान-सन्मान दिला. यावर्षी माजी नगराध्यक्षा स्व. नमिता नाईक यांच्या हस्ते त्यांना वाण देण्यात आले.
2011

कृषीवल हळदीकुंकू समारंभ

वारसा परंपरेचा, दिवस मानाचा
पूर्वी चूल आणि मूल एवढेच स्त्रियांचे कार्यक्षेत्र होते. मात्र कृषीवल हळदीकुंकवाच्या निमित्ताने चार भिंतीच्या आत कोंडल्या गेलेल्या स्त्रियांना बाहेर पडता येऊ लागले. आता परिस्थिती बदलली असली तरी, हळदीकुंकवाच्या प्रथेला मात्र अजूनही तितकेच महत्त्व आहे. कृषीवलनेही ही परंपरा गेली 27 वर्षे अखंडितपणे जपली आहे.
2003-04

कृषीवल हळदीकुंकू समारंभ

सौभाग्याचं वाण, आनंदाला उधाण
कोणताही भेदभाव न करता स्वाभिमानानं वाण लुटता येणारं ठिकाण म्हणजे कृषीवलचा हळदीकुंकू सोहळा. या सोहळ्यात वाण स्वीकारून स्त्रीत्वाचा खरा दागिना मिळवताना त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद पाहून कृषीवल परिवारही आनंदी होतो. हा हृदय सन्मान सोहळा महिला दरवर्षी अभिमानानं अनुभवतात.
2001-02

कृषीवल हळदीकुंकू समारंभ

अत्तराचा सुगंध, तिळगुळाचा स्वाद
या हळदीकुंकू समारंभात केवळ हिंदू धर्मीय महिलाच नव्हे, तर मुस्लिम, शीख, पारसी महिलादेखील मोठ्या उत्साहात सहभागी होतात. त्यांच्या उपस्थितीमुळे जिल्ह्यात सामाजिक ऐक्य पहायला मिळते. तसेच या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी कोणतेही नियम व अटी नसल्यामुळे त्या आनंदाने सहभागी होतात.
1998-1999-2000

कृषीवल हळदीकुंकू समारंभ

महिलांना वाण देताना सुप्रिया पाटील, भावना पाटील, चित्रा पाटील, शैला पाटील आदी.
हळदीकुंकू म्हणजे सौभाग्यवतीने केवळ वाण लुटण्याचा कार्यक्रम नाही, तर त्यातून स्त्रियांतील समतेचा संदेश देण्याचा प्रयत्न कृषीवलने केला. कारण महिलांचा सन्मान हाच कृषीवलचा अभिमान.
महिलांच्या भरगच्च उपस्थितीमुळे शेकाप कार्यालयही अपुरे पडले. त्यामुळे हजारोंच्या गर्दीलाही योग्य नियोजन करुन वाण देण्याचे काम सुप्रिया पाटील यांच्यासह भावना पाटील, शैला पाटील, चित्रा पाटील, स्व. नमिता नाईक आदींनी केले.
1996-1997

कृषीवल हळदीकुंकू समारंभ

दिवस मानाचा...सौभाग्याचा!
महिलांचा उत्साह तसेच वाढती उपस्थिती लक्षात घेता 1996 मध्ये हा सोहळा शेकाप कार्यालयात आयोजित करण्यात आला होता.
कृषीवल हळदीकुंकू सोहळा म्हणजे आनंदाची खाण. त्यामुळे शहरासोबतच जवळपासच्या महिलाही या सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहत. या सोहळ्यात महिलांना वाण देताना सुप्रिया पाटील व अन्य.
1995

कृषीवल हळदीकुंकू समारंभ

प्रारंभ...नव्या युगाचा, नव्या पर्वाचा!
रोजच्या धकाधुकीच्या जीवनातून महिलांना थोडा क्षण मिळावा, एकमेकींसोबत संवाद घडावा, एकमेकींच्या विचारांचे आदान-प्रदान व्हावे, त्यांना एक हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने ‘कृषीवल’ने हळदीकुंकू सोहळ्यास सुरुवात केली आणि खर्‍या अर्थाने नव्या युगाचा, नव्या पर्वाचा प्रारंभ झाला. पहिल्या वर्षीच्या या सोहळ्यात जवळपास एक हजार महिलांनी उपस्थिती दर्शविली. सुप्रिया पाटील यांनी आयोजित केलेल्या सोहळ्यास आज 27 वर्षे पूर्ण झाली आहेत. आजही हा सोहळा त्याच उत्साहात मोठ्या दिमाखात पार पडत आहे. त्यामुळे सर्वच स्तरातून या सोहळ्याचे कौतुक होत आहे.